- मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
- भाडोत्री इमारतींतील ३,५०० अंगणवाड्यांसाठी जागा व निधीनुसार बांधकाम
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील अनेक अंगणवाडी केंद्रे सध्या भाडोत्री किंवा पर्यायी इमारतींमध्ये कार्यरत असून, जमीन आणि निधी उपलब्धतेनुसार त्यांच्या स्वतःच्या इमारती उभारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास, अपंग सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी आमदार काशप्पा शिवशंकरप्पा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, इलकल आणि हुनगुंद तालुक्यांतील एकूण ३५८ अंगणवाडी केंद्रांपैकी २१७ केंद्रांना स्वतःच्या इमारती आहेत. ४१ केंद्रे सरकारी किंवा इतर इमारतींमध्ये पर्यायी स्वरूपात सुरू असून, १०० केंद्रे भाडोत्री इमारतींमध्ये कार्यरत आहेत.
राज्यभरात सुमारे ३,५०० अंगणवाडी केंद्रे भाडोत्री इमारतींमध्ये सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व केंद्रांसाठी स्वतंत्र इमारती उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया सुरू असून, ज्या ठिकाणी नवीन इमारती बांधणे शक्य नाही, त्या ठिकाणी जीर्ण किंवा अयोग्य इमारतींमधून केंद्रे इतर सुरक्षित इमारतींमध्ये स्थलांतरित केली जातील.
स्वतःच्या इमारतींसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत महसूल विभागाला आधीच पत्र पाठवण्यात आले असून, या दिशेने ठोस कार्यवाही केली जात असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.








