• चार दिवसीय तपासणी टप्पा पूर्ण
  • हॅपीहार्ट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांचा संयुक्त उपक्रम 

बेळगाव : मुलांच्या आरोग्य व कल्याणासाठी हॅपीहार्ट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ या आरोग्य अभियानाचा चार दिवसीय तपासणी टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. पर्याय फाउंडेशननेही या उपक्रमाला सहकार्य केले.

कॅन्टोन्मेंट बोर्ड, बेळगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अभियानाची सांगता झाली. यावेळी ३१५ विद्यार्थ्यांची ॲनिमियासाठी तपासणी करण्यात आली. चार दिवसांत एकूण १,४७५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

मुलांमध्ये ॲनिमियाबाबत जनजागृती करणे, त्याचे लवकर निदान करणे आणि वेळेवर पोषणात्मक उपाययोजना उपलब्ध करून देणे हा अभियानाचा मुख्य उद्देश होता.

अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लबने हॅपीहार्ट फाउंडेशन, पर्याय फाउंडेशन, स्वयंसेवक आणि क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी अध्यक्ष रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी ॲनिमियाचे लवकर निदान व वेळेवर उपचार आणि पोषणात्मक हस्तक्षेपाचे महत्त्व अधोरेखित केले. सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी उपक्रमात सहभागी सर्व संस्था, स्वयंसेवक आणि सदस्यांच्या योगदानाचे कौतुक केले.