बेळगाव / प्रतिनिधी
उत्तर कर्नाटकाच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी बेळगावात इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा अवजड व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी विधानसभेत केली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांनी बेळगाव परिसरात एअरोस्पेस पार्क आणि डिफेन्स पार्क सुरू करण्याची मागणी केली. उत्तर कर्नाटकात मोठे उद्योगधंदे उभे राहिले तर बेरोजगारी कमी होईल, विशेषतः बेळगाव आणि हुबळी-धारवाड दरम्यान एअरोस्पेस पार्क सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असे बेल्लद यांनी सांगितले.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले की, बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यात चन्नरायपट्टणजवळील १३ गावांमध्ये १,७७७.२ एकर जमीन संपादित करून एअरोस्पेस आधारित उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सर्व उद्योग केवळ दक्षिण कर्नाटकातच केंद्रित राहिल्यास उत्तर कर्नाटकाचा विकास कसा होणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी बेळगावात इंडस्ट्रीयल पार्क उभारण्याची घोषणा केली.
बेळगावात इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, बेळगाव, हुबळी-धारवाड आणि विजापूर परिसरात डिफेन्स कॉरिडॉर सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा झाल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी सभागृहात दिली. या निर्णयामुळे उत्तर कर्नाटकात उद्योग, रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.








