- बेळगाव परिसरात सायंकाळी पावसाच्या सरी
- नागरिकांची त्रेधातिरपीट
- हवामानात अचानक बदल
बेळगाव : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरू असतानाच बेळगाव शहर व परिसरात हवामानाने अनपेक्षित वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असला, तरी रविवारी व मंगळवारी सायंकाळी काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना हिवाळ्यातच पावसाचा अनुभव घ्यावा लागला.
काल व आज दिवसभर दमट हवामान जाणवत होते. त्यातच मंगळवारी सायंकाळी शहराच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने वातावरण अधिकच बदलले. अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वर्दळ विस्कळीत झाली, तर काही काळ थंडीबरोबरच आर्द्रताही वाढल्याचे जाणवले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत किमान तापमानात चढ-उतार सुरू राहणार असून गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हिवाळ्याच्या काळातच पावसाच्या सरी पडत असल्याने नागरिकांमध्ये “हिवाळा की हिवसाळा?” अशी चर्चा सुरू झाली आहे.








