- बसवराज हिरेमठ यांचे धाडस ; सात मिनिटांत बचावकार्य यशस्वी
बेळगाव / प्रतिनिधी
आईच्या निधनाच्या आघातातून सावरू न शकल्याने एका व्यक्तीने विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र एचईआरएफ पथकाच्या तात्काळ आणि धाडसी कारवाईमुळे त्याचा जीव वाचला.
बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील बाबू पांडू सांबरेकर (वय ४१) यांची आई पंधरा दिवसांपूर्वी वारली होती. या धक्क्यामुळे ते मानसिक तणावात होते. त्यातूनच त्यांनी गावाजवळील विहिरीत उडी घेतली. स्थानिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला ; परंतु परिस्थिती गंभीर असल्याने एचईआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले.
माहिती मिळताच पथकप्रमुख बसवराज हिरेमठ अवघ्या सात मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही विलंब न करता त्यांनी कमरेला लोखंडी साखळी बांधून विहिरीत झेप घेतली. पाण्यात जीवासाठी झुंज देणाऱ्या सांबरेकर यांना धीर देत त्यांनी अत्यंत सुरक्षितरीत्या वर आणले.
गेल्या १६ वर्षांपासून आपत्कालीन परिस्थितीत सेवा देणाऱ्या एचईआरएफच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. बसवराज हिरेमठ यांच्या प्रसंगावधानामुळे एक अनर्थ टळला असून कुटुंबीयांनीही कृतज्ञता व्यक्त केली आहे.







