- पीडित महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय देण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
घरबसल्या रोजगार देण्याचे आमिष दाखवत हजारो महिलांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण बेळगावात उघडकीस आले आहे. संबंधित आरोपी महाराष्ट्रातील असून, सध्या फरार आहे. या घटनेविरोधात फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातजाऊन निषेध नोंदवला. तसेच संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाईची करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रातील सोलापूर येथील दादासाहेब कोळेकर या व्यक्तीने स्वतःचे नाव ‘अजय पाटील’ असे खोटे सांगून बेळगाव जिल्ह्यातील हजारो महिलांना फसवले. त्याने “बी. एम. महिला उद्योग समूह” या नावाने संस्था स्थापन करून घरबसल्या अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या योजनेसाठी प्रत्येकीकडून २५०० ते ५००० रुपये ‘नोंदणी शुल्क’ म्हणून घेतले जात होते.
सुरुवातीला काही महिलांना किरकोळ पैसे देऊन विश्वास संपादन करण्यात आला, मात्र नंतर तो लाखो रुपयांसह फरार झाला. एकूण ४,००० हून अधिक महिलांना या माध्यमातून फसवले गेले असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
आंबेवाडी परिसरातील काही महिलांनी सांगितले की, आरोपीने त्यांच्या नावावर ओळखपत्रे तयार करून, मासिक सभेच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम गोळा केली. आंबेवाडी परिसरातील सुमारे १२० महिलांकडूनच दोन अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.मात्र आता तो कुठेही सापडत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यात या ‘बी.एम. महिला उद्योग समूहा’तर्फे अगरबत्ती, मेणबत्ती आणि विविध वस्तूंच्या पॅकिंगच्या नावाखाली महिलांकडून पैसे उकळण्यात आले. आतापर्यंत ५,००० पेक्षा जास्त महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, विविध पोलीस स्थानकांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या प्रकरणी श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले की, महिलांच्या मेहनतीचा गैरफायदा घेणाऱ्या या फसव्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.








