बेळगाव : मुंबईतील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जीवनावर अलीकडेच प्रकाशित झालेल्या “आता थांबायचं नाय” या मराठी चित्रपटाचे रियल हिरो आणि मूळ गोंधळी गल्ली बेळगाव चे असलेले श्री. उदयकुमार इंदुमती रामचंद्र शिरूरकर हे शनिवार दि.१९ जुलै रोजी बेळगावकरांच्या भेटीस येत आहेत.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगाव शहर आणि तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शाळातून दहावी परीक्षेत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास वक्ते म्हणून श्री. उदयकुमार शिरूरकर व पाहुणे म्हणून मराठा मंदिरचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब गुरव हे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री अनंत लाड हे राहणार आहेत.

ज्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपली नावे यापूर्वी वाचनालयाकडे नोंदवली आहेत त्या सर्वांनी आपल्या पालकांसमवेत या कार्यक्रमास उपस्थित राहावे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे त्यामुळे नागरिकांनीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या कार्यवाह सुनीता मोहिते, उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, सहकार्यवाह अनंत जांगळे आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.