• ‘बेल्कॉन २०२६’ गृहनिर्माण प्रदर्शन उद्यापासून
  • सीपीएड मैदानावर भव्य उद्घाटन
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णींची विशेष उपस्थिती

बेळगाव : क्रेडाई बेळगावच्या वतीने आयोजित भव्य बांधकाम व गृहनिर्माण प्रदर्शन ‘बेल्कॉन २०२६’ चा उद्घाटन समारंभ उद्या गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सीपीएड मैदानावर होणार आहे. कर्नाटकात बेंगळूरुनंतर प्रथमच बेळगावमध्ये आलिशान, संपूर्ण वातानुकूलित भव्य शामियान्यात हे प्रदर्शन भरत असून बेळगावकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ आणि कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष भास्कर टी. नागेंद्रप्पा उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

सीपीएड मैदानावरील सुमारे १ लाख स्क्वेअर फूट प्रशस्त जागेत उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे बांधकाम व गृहनिर्माण प्रदर्शन म्हणून ‘बेल्कॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १८० स्टॉल्स असून, बेळगाव शहरातील ३०० हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. याशिवाय बांधकाम साहित्य, गृहवित्त व बँकिंग सेवा देणाऱ्या नामांकित कंपन्या व वित्तीय संस्थांचे ६० हून अधिक स्टॉल्स असतील. प्रमुख बिल्डर्स, वास्तुविशारद, अभियंते, बँकर्स आणि तज्ज्ञ या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

या प्रदर्शनात सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली घरे, भूखंड, फ्लॅट्स, व्यावसायिक मालमत्ता, संकुले, आधुनिक बांधकाम साहित्य तसेच नव्या अंतर्गत सजावटीचे नमुने पाहता येणार असून आवश्यक खरेदीची संधीही उपलब्ध होणार आहे. घर बांधण्याचा किंवा खरेदीचा विचार करणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांना येथे सर्वसमावेशक माहिती मिळणार आहे.

‘बेल्कॉन २०२६’ ला प्रिया शक्ती स्टील, ओरिओनिस बिल्डर्स, जीएम इलेक्ट्रिकल्स, श्रीराम इनोव्हेशन, विशाल इन्फ्राबिल्ड, विवा डेव्हलपर्स, अमर कन्स्ट्रक्शन, साई राज बिल्डर्स, चैतन्य प्रॉपर्टीज, नुराणी डेव्हलपर्स, पार्वती कन्स्ट्रक्शन, कोणे एलिव्हेटर्स, यश पॉली, विजय धामणेकर, फॅब टेक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

५ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला बेळगावसह उत्तर कर्नाटक, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे दीड लाख नागरिक भेट देतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. प्रदर्शन दररोज सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे. ‘बेल्कॉन २०२६’ चे आयोजन यश इव्हेंट्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट व्हा. चेअरमन प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष सुधीर पनारे, जनसंपर्क प्रमुख सचिन बैलवाड, उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सहसचिव सचिन कळ्ळीमणी, ज्ञानेश्वर सायनेकर, वीरेश शेट्टण्णावर, राजेश माळी, दीपकुमार शेख, दीपक गोजगेकर, महिला विभाग कर्नाटक राज्य समन्वयक दीपा वांडकर, करुणा हिरेमठ, सचिव सविता सायनेकर, युथ विंग समन्वयक अभिषेक मुतकेकर, सचिव जयराज माळी, तसेच यश इव्हेंट्सचे संचालक अजिंक्य कालकुंद्रीकर आणि विनय कदम यांच्यासह क्रेडाई बेळगावचे पदाधिकारी व सदस्य जातीने प्रयत्न करत आहेत.