- स्वच्छता व जेवणाच्या गुणवत्तेवर भर देण्याचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहराच्या सुभाषनगर परिसरातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या सरकारी वसतिगृहाला आमदार आसिफ सेठ यांनी आज अचानक भेट देत मूलभूत सुविधांची सखोल पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि हिताला प्राधान्य देत स्वच्छता व दर्जेदार आहाराबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
वसतिगृहातील इमारतीची स्थिती, विद्यार्थ्यांच्या खोल्या, स्वच्छतागृह सुविधा तसेच परिसरातील एकूण स्वच्छतेची त्यांनी तपासणी केली. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.
स्वयंपाकघरालाही त्यांनी विशेष भेट देत जेवणाची गुणवत्ता स्वतः तपासली. अन्न तयार करण्याची पद्धत, स्वच्छतेची स्थिती आणि साठवण व्यवस्था यांची पाहणी करून कर्मचाऱ्यांना गुणवत्तेबाबत कोणतीही हलगर्जीपणा चालणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले.
सरकारी वसतिगृहांमध्ये शिस्तबद्ध कारभार आणि प्रभावी व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे नमूद करत, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले.








