मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (वय ९१) यांचे सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
‘थ्री इडियट्स’ मध्ये त्यांनी साकारलेली कठोर पण लक्षवेधी प्राध्यापकाची भूमिका लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अच्युत पोतदार भारतीय लष्करात कार्यरत होते. सैन्यात कॅप्टन पदावरून निवृत्ती घेतल्यानंतर अच्युत पोतदार यांनी शिक्षण, भारतीय सैन्य दल आणि इंडियन ऑईल कंपनीतही सेवा बजावली. मात्र, अभिनयातील आवडीमुळे १९८० च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पुढील चार दशकांहून अधिक काळ हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली स्वतंत्र छाप सोडली.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत १२५ हून अधिक हिंदी व मराठी चित्रपटांत अभिनय केला आहे. यामध्ये आक्रोश, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, अर्ध सत्य, तेजाब, परिंदा, राजू बन गया जेंटलमॅन, दिलवाले, रंगीला, वास्तव, हम साथ साथ हैं, परिणीता, लगे रहो मुन्ना भाई, दबंग २ आणि व्हेंटिलेटर हे त्यांचे गाजलेले व समीक्षकांनी दाद दिलेले चित्रपट आहेत.