बेळगाव : “१७८ वर्षाची परंपरा असलेल्या या वाचनालयाच्यावतीने अशा प्रकारची संगीत भजन स्पर्धा आयोजित करून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेतील भजन ऐकून मला खूप आनंद झाला” असे विचार प्रख्यात गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते अवधूत गुप्ते यांनी बोलताना व्यक्त केले.

श्री. अवधूत गुप्ते हे बेळगावला आले असताना त्यांनी वाचनालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीस मान देऊन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठा मंदिर येथे सुरू असलेल्या संगीत भजन स्पर्धेस सोमवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेतील एका गटाने सादर केलेले पहाडी आवाजातील भजन ऐकून ते मंत्रमुग्ध झाले. उपस्थित रसिकांनी व्यक्त केलेल्या इच्छेखातर त्यांनी “जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं ,देवा तुझ्या नावाचं याड लागलं” हा अभंगही सादर केला . “आजची माझी संध्याकाळ छान झाली, असे सांगून ते म्हणाले की,” केवळ इतिहास महत्त्वाचा नसतो, त्या इतिहासाची प्रतिबिंब वर्तमानात असतात, ती जपून ठेवायची असतात आणि त्यासाठी अशा वाचनालयाची गरज असते.”

वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी प्रास्ताविक करून अवधूत गुप्ते यांचा परिचय करून दिला. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना वाचनालयाचे स्मृतिचिन्ह प्रदान करून शुभेच्छा दिल्या.

“एका प्रकल्पावर काम करण्यासाठी आम्ही बेळगावात आलो होतो. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील” असा विश्वास गुप्ते यांनी व्यक्त केला. याप्रसंगी वाचनालयाच्या कार्यवाह सुनिता मोहिते, संचालक अभय याळगी, प्रसन्ना हेरेकर, व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर, इतर कर्मचारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.