बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी खुल्या वाहनातून परेडचे निरीक्षण केले.

यावेळी बेळगाव महापालिका, सी.ए.आर.डी.ए.आर., महिला आणि पुरुष नागरी पोलिस दल, गृहरक्षक दल, महिला आणि पुरुष केएसआरपी दल, उत्पादन शुल्क विभाग, अग्निशमन विभाग, एस.सी.सी विभाग आणि विविध शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पथकांनी अतिशय शिस्तबद्धतेने पथसंचलन सादर केले.

यानंतर बेळगाव जिल्हापालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, भारतीयांनी संघर्षातून मिळवलेल्या स्वातंत्र्यामुळे जगाच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. जगातील लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया रचला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, बाळ गंगाधर टिळक आणि इतर अनेक महान व्यक्तींचे स्मरण करणे हे आपल्या सर्वांचे प्राथमिक कर्तव्य आहे. कित्तूर राणी चन्नम्मा यांनी फुंकलेले स्वातंत्र्याचे रणशिंग वणव्यासारखे सर्वत्र पसरल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सरकारने अनेक लोकाभिमुख कार्यक्रम आखले आहेत. सामाजिक न्याय आणि समानतेच्या मार्गावर त्यांनी एक ठोस पाऊल टाकले आहे. लोकांना दिलेल्या वचनानुसार, त्यांनी शक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती, गृहलक्ष्मी आणि युवानिधी या पाच हमी योजना यशस्वीरित्या अंमलात आणल्या आहेत आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत आहेत. दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या व्यापक विकासासह पुढे जाणाऱ्या सरकारने एकूण २१५ कोटी रुपये खर्चाच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच कामाचे आदेश जारी केले जातील, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हापालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी आमदार आसिफ (राजू) सेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, विधानपरिषद सदस्या सायबाण्णा तळवार, नगरसेवक, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी तहसीलदार बसवराज नगराळ, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांच्यासह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.