बेळगाव / प्रतिनिधी
वर्षभरापासून बहुप्रतीक्षेत असणाऱ्या बेळगाव – बेंगळुरू वंदे भारत रेल्वेचा रविवारी शुभारंभझाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तर रात्री ८:३० वाजता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावात या रेल्वेचे स्वागत केले.
गेल्या वर्षभरापासून अधिक काळ या रेल्वेचे उद्घाटनाची प्रतीक्षा होती. हुबळी ते बेंगळुरू वंदे भारत सुरू झाल्यानंतर सदर रेल्वेसेवा बेळगाव पर्यंत वाढवावी अशी वारंवार मागणी झाली होती. मात्र तांत्रिककारण देत याला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर खासदार जगदीश शेट्टर आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या माध्यमातून बेळगाव – बेंगळूर वंदे भारत रेल्वेचे स्वप्न साकार झाले आहे.बेळगावहून बेंगळूरूला विमान व्यतिरिक्त तात्काळ जाण्यासाठी बेळगावकरांना या रेल्वेचा उपयोग होणार आहे.
या वंदे भारतच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात बेळगावहून बेंगळुरूला जाण्यासाठी जवळपास ८ तासाचा प्रवास करावा लागणार आहे.पहाटे ५ : २० मिनिटांनी बेळगावतून वंदेभारत रवाना होणार असून दुपारी १ : ५० मिनिटांनी बंगळुरूला पोहोचणार आहे. तर दुपारी २: २० मिनिटांनी बंगळूरहून बेळगावकडे परतीचा प्रवास करणार असून रात्री १०: ४० मिनिटांनी सदर रेल्वे बेळगावला पोहोचणार आहे.बेळगाव बेंगळूर साठी एसी एक्झिक्यूटिव्ह तिकीट दर २९३० तर एसी चेअर कार हा तिकीट दर १६३० असे आकारण्यात आले आहे.
रविवारी रात्री ८.३० वाजता वंदे भारत बेळगाव स्थानकावर दाखल होताच याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी खासदार मंगला अंगडी, रेल्वेचे अधिकारी, बेळगावचे आजी – माजी लोकप्रतिनिधी, आमदार उपस्थित होते.