बेळगाव / प्रतिनिधी

शेतवडीतील विहिरीत पडून नेताजी गल्ली, बेनकनहळ्ळी येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रेणुका आप्पाजी देसूरकर (वय ४५) रा. बेनकनहळ्ळी असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. 

गुरुवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी रेणुका या आपल्या मुलाबरोबर कामासाठी शेताला गेल्या होत्या. मुलगा पुढे होता, त्या पाठीमागे येत होत्या. आई ‘दिसली नाही म्हणून मुलाने सर्वत्र शोध घेतला असता विहिरीवर मोबाईल व रेनकोट आढळून आला. विहिरीत पडली असणार या संशयाने एचईआरएफ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, राजू टक्केकर आदींनी पाण्यात दिसणाऱ्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने ८० फूट खोल विहिरीत पाहणी केली असता रेणुकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीने तो पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मुलगा ओंकार आप्पाजी देसूरकर याने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीणचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.