बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात शहर पोलीस आयुक्तांना आमदार राजू सेठ यांच्या हस्ते १३ नवीन बुलेट बाईक सुपूर्द करण्यात आल्या. यामुळे पोलिसांना लहान-लहान गल्ल्यांमध्ये पेट्रोलिंग करणे अधिक सोपे होणार आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांनी आपल्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून या १३ नवीन बुलेट बाईक सोमवारी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यानंतर आमदार आणि पोलीस आयुक्तांनी नवीन बुलेट बाईकवर रॅली काढून या उपक्रमाची सुरुवात केली.

यावेळी पोलीस विभागाला बाईक वितरित करताना आमदार राजू सेठ म्हणाले, “आपण पोलिसांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत, त्यांच्यावर फक्त आरोप करणे योग्य नाही. भविष्यातही विभागाला काही मदत लागल्यास ती आमदार निधीतून दिली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, “पोलीस विभागाला उत्तर मतदारसंघाच्या आमदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. बेळगावात लहान-लहान गल्ल्या असल्याने मोठ्या वाहनांतून पेट्रोलिंग करणे कठीण होते. बाईकमुळे पोलिसांना या गल्ल्यांमध्ये पेट्रोलिंग करणे आणि भेटी देणे शक्य होईल. यामुळे येत्या काळात अधिक प्रभावी पोलीस सेवा देण्यास मदत होईल,” असेही ते म्हणाले.
यावेळी डीसीपी नारायण बरमणी, एसीपी सदाशिव कट्टीमणी, सीपीआय जे. एम. कालिमिर्ची, गड्डेकर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
