- विविध संघटनांतर्फे शोकसभेत श्रद्धांजली
बेळगाव / प्रतिनिधी
साम्यवादी परिवारातील कला सातेरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन असो किंवा महिलांच्या कोणत्याही आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. चळवळीबरोबरच सभा- समारंभामध्येही त्या उपस्थित राहायच्या. यावरून त्यांच्या सक्रियपणाची जाणीव निश्चितच होती. महिला फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक चळवळी उभारल्या. त्यांची सक्रियवृत्ती आदर्शवत होती. यापुढील महिलांच्या आंदोलनाला त्यांची उणीव भासणार आहे, अशी भावना कॉ. अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले. भारतीय कम्युनिस्ट कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या तसेच भारतीय महिला फेडरेशन, अन्नपूर्णा महिला मंडळ यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी, कॉ. कला सातेरी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी शोकसभेचे आयोजन केले होते. गिरीष कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या या शोकसभेत आजगावकर बोलत होते. निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी, एक मिनिट मौन पाळून कला सातेरी व कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध संघटनांनी कला सातेरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
शिवराज पाटील, रामचंद्र मोदगेकर, संजय सातेरी, अनंत लाड, कृष्णा शहापूरकर, परशराम मोटराचे, अनिल पाटील, शिवलिला मिसाळे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रा. मेणसे म्हणाले कला सातेरी यांचे शिक्षण कमी असले तरी कोणत्याही चळवळीसाठी शिक्षण कधीच आड आले नाही. कम्युनिस्ट पक्षातर्फे काम करताना नेहमीच पुढे असायच्या. कोणतेही काम करण्यास त्या मागे राहत नव्हत्या. शोकसभेला विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला सदस्या उपस्थित होते.