• मध्यवर्ती सार्व. गणेशोत्सव महामंडळाचा महापालिकेला दणका !

बेळगाव / प्रतिनिधी

पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने उभारलेला मराठी फलक काल महापालिका प्रशासनाने हटविला होता. महापालिकेच्या या कारवाई विरोधात मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने जोरदार आवाज उठवताच आज शनिवारी तो फलक पूर्ववत उभारण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाटील गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने पाट पूजा केल्यानंतर शहीद भगतसिंग चौकात बाप्पाच्या स्वागताचा मराठी भाषेतील भव्य फलक उभारला होता. परंतु या फलकावर कन्नड भाषेचा वापर केला नसल्याचे कारण सांगून महापालिका प्रशासनाने काल शुक्रवारी सायंकाळी तो फलक हटवला होता.

महापालिका प्रशासनाच्या या कृतीबद्दल शहरातील मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने देखील तीव्र निषेध केला. दरम्यान आज मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली. अखेर महापालिका प्रशासनाने आज नमते घेत पाटील गल्ली येथील हटवण्यात आलेला फलक पुन्हा उभारण्यास परवानगी दिली. त्यानुसार गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने बाप्पाच्या स्वागताचा फलक होता त्या जागी पुन्हा उभारला. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिसरातील गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी मध्यवर्ती हे सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी आदींसह पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.