बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव पोलिसांनी गुन्हेगारी कमी करण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात प्रामाणिक सेवा बजावली आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आणखी जनस्नेही पद्धतीने सेवा द्यावी, असे आवाहन आयजीपी चेतनसिंग राठोड यांनी केले. बेळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिक सेवा बजावलेल्या बेळगाव पोलिसांना प्रशस्तिपत्रे प्रदान करण्याचा समारंभ बेळगाव येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

सुरुवातीला विविध पोलीस तुकड्यांनी आकर्षक व शिस्तबद्ध परेड सादर केली. परेडचे निरीक्षण केल्यानंतर आयजीपी चेतनसिंग राठोड यांनी सांगितले की, परेडमधील शिस्त पोलिसांनी आपल्या सेवेत नेहमी कायम ठेवावी. बेळगाव जिल्ह्यातील पोलीस गुन्हेगारी रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राउण्यात कोणतीही उणीव न ठेवता प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. अलीकडेच पार पडलेली गोकाक येथील श्री लक्ष्मीदेवी यात्रा याचे उत्तम उदाहरण आहे. आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण-उत्सवही योग्य प्रकारे हाताळावेत. नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी दिलेल्या संदेशानुसार, पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांशी जनस्नेही पद्धतीने वागून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखत जनस्नेही सेवा देणाऱ्या पोलिसांना प्रशस्तिपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त एसपी श्रुती, अतिरिक्त एसपी बसरगी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.