- बेकवाड येथील घटना : शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान
खानापूर / प्रतिनिधी
तालुक्यातील एका शेतकऱ्याचे दोन बैल तलावात बुडून दगावल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. याबाबतची माहिती नंदगड पोलिसांना दिली आहे. खानापूर पशुवैद्य अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह शेतकऱ्याच्या हवाली केले. दोन्ही बैल एकाच वेळी दगावल्याने शेतकऱ्याचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
बेकवाड येथील शेतकरी गुंजू पाटील आपल्या शेतात भातरोप लावणीच्या पूर्व मशागतीसाठी गेले होते. दुपारपर्यंत शेतात चिखल करण्याचे काम केल्यानंतर घरी परतत असताना चिखलामुळे घाण झालेले बैल धुण्यासाठी तलावात उतरले. मात्र, तलावाची रोजगार हमी योजनेच्या कामातून खोलबंदी केली होती. त्यामुळे धुण्यासाठी पाण्यात घातल्यानंतर बैलांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल खड्ड्यात दोन्ही बैल बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बैल बुडत असताना आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे शेतकरी तलावाजवळ आले. बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोटात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने दोन्ही बैल मृत्युमुखी पडले.
याबाबतची माहिती माजी आमदार अरविंद पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत केली. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मदत करण्याची सूचना केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे शेतकऱ्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.