- अधिकारी – पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महामंडळाची हेस्कॉमकडे मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशमूर्तीची ने-आण करताना तसेच मंडप घालताना वीजवाहिन्यांमुळे अडथळे येतात. त्यामुळे हेस्कॉमने शहरातील मंडळांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्या त्या ठिकाणी वीजवाहिन्यांची उंची वाढवावी. तसेच वाहतुकीस अडथळे ठरत असलेले वीजखांब हटवावेत, अशी मागणी बुधवारी झालेल्या हेस्कॉम अधिकारी व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली.
बुधवारी रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये समस्या मांडल्या. मुख्य मार्गांवर लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे गणेशमूर्ती ने – आण करताना मंडळांना अडचणी येत आहेत. बऱ्याच वेळा विजेचा धक्का लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विसर्जन मार्गावरील वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे म्हणाले, गणेशमूर्तींना अडथळे ठरत असलेल्या वीजवाहिन्यांची उंची वाढविण्यात आली आहे. मंडळांच्या सोयीसाठी एक खिडकी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे मंडळांनी लवकर वीजपुरवठा घ्यावा. जेणेकरून शेवटच्या वेळी अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी धोकादायक वीजवाहिन्या अथवा खांब आहेत, त्यांनी तात्काळ हेस्कॉम कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबाबतची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. बैठकीला हेस्कॉमच्या साहाय्यक कार्यकारी अभियंता जयश्री बजंत्री यांच्यासमवेत मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे महादेव पाटील, विकास कलघटगी , आनंद आपटेकर, सतीश गौरगोंडा, सागर पाटील, विराज मुरकुंबी, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, राजकुमार खटावकर, गिरीश धोंगडी , हेमंत हावळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.