- सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील घटना
सौंदत्ती / वार्ताहर
कीटकनाशक मिश्रित दूषित पाणी पिल्याने १२ मुलांची प्रकृती बिघडली. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. येथील जनता कॉलनी सरकारी कनिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत काही अज्ञातांनी कीटकनाशक टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कीटकनाशक मिसळलेले पाणी पिल्याने मुलांची प्रकृती बिघडली. चक्कर येणे आणि उलट्या होणे अशी लक्षणे आढळलेल्या १२ मुलांना उपचारासाठी सौंदत्ती तालुका रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान बेळगावचे डीएचओ ईश्वर गडाद आणि डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांनी सौंदत्ती रुग्णालयाला भेट दिली. यावेळी डीएचओ डॉ. ईश्वर गडाद यांनी मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डीएचओ ईश्वर गडाद यांच्या म्हणण्यानुसार पोलिस पाण्याच्या टाकीत कीटकनाशक टाकल्याची चौकशी करत आहेत.