बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव विभागातून २०२६ सालचा प्रतिष्ठित ‘सहकार रत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. दिगंबर एस. पवार यांचा समस्त चव्हाट गल्ली नागरिकांच्या वतीने गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. चव्हाट गल्लीतील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयात सायंकाळी ७ वाजता हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच बाबुराव लक्ष्मणराव मोहिते होते. व्यासपीठावर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, मराठा बँकेचे चेअरमन शेखर हंडे, व्हाईस चेअरमन विनोद हंगिर्गेकर, दलित समाजाचे प्रतिनिधी मल्लेश चौगुले, माजी नगरसेवक पुंडलिक परीट, बँकेचे संचालक मोहन चौगुले व विश्वजीत हसबे यांच्यासह चव्हाट गल्लीतील ज्येष्ठ पंचमंडळी लक्ष्मण किल्लेकर, नानासाहेब पवार, ज्योतिबा धामणेकर, ज्योतिबा नाईक, रमेश मोदगेकर, लता किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मराठा बँकेचे संचालक विश्वजीत हसबे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर चेअरमन शेखर हंडे यांनी श्री. पवार यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी चव्हाट गल्लीच्या शेकडो वर्षांच्या शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील इतिहासाचा उजाळा देत बेळगावच्या विकासात गल्लीचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. मल्लेश चौगुले यांनी चव्हाट गल्ली आणि बहुजन समाजातील घट्ट नात्याचा उल्लेख केला.
अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सत्कारमूर्ती श्री. दिगंबर पवार व त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि मानाचा भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. पवार यांनी आपल्या सहकार क्षेत्रातील प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. “हा पुरस्कार मला सहकार्य करणाऱ्या असंख्य लोकांना समर्पित करतो. या पुरस्कारावर न थांबता भविष्यातही समाज, बेळगाव शहर आणि विविध संस्थांच्या प्रगतीसाठी अखंड कार्यशील राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
याच कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रात राज्य पातळीवर नियुक्ती झाल्याबद्दल मल्लेश चौगुले यांचा, तसेच चव्हाट गल्ली आणि मराठा बँकेचे ऋणानुबंधन लक्षात घेऊन चेअरमन शेखर हंडे व व्हाईस चेअरमन विनोद हंगिर्गेकर यांचा गल्लीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
याशिवाय बेळगावचा राजा सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ, सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, श्री ज्योतिबा देवस्थान व श्री देव दादा सासनकाठी, सिद्धकला भजनी मंडळ, शिवशंभू ढोल पथक, श्री चव्हाटा युवक संघटना, मोरया ग्रुप, क्रांतिवीर रिक्षा स्टॅन्ड मित्रपरिवार, कल्याण चौक गणेश मंदिर संघटना, समस्त पवार कुटुंब, मराठा बँक संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग तसेच मित्रपरिवाराने श्री. पवार यांचा स्वतंत्रपणे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. शेवटी श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे खजिनदार प्राचार्य आनंद आपटेकर यांनी सर्व मान्यवर, मंडळे आणि नागरिकांचे आभार मानले.








