- दोघांना अटक ; एक आरोपी फरार
बेळगाव : शहरातील भाजी मार्केट परिसरात जुन्या इंदिरा कॅन्टीनजवळ सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यावर मार्केट पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केली. या कारवाईदरम्यान एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला.
१७ नोव्हेंबर रोजी मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय पी. जी. गंडाव्वगोळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. यावेळी सादिक हाशिम हाजी (४५, रा. बुखारी गल्ली) आणि विनायक श्रीकांत कित्तूरकर (३८, रा. शिवाजीनगर) यांना अटक करण्यात आली. तर गजानन शशिकांत हा तिसरा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
आरोपींकडून १ हजार ६१० रुपये रोख आणि मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ अन्वये कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास मार्केट पोलीस करीत आहेत.







