- मृतदेह दोन गोण्यांत भरून धरणाच्या खाडीत फेकला
- सोन्याचे दागिनेही लुटले
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या पैशांतील वाटा देण्यास नकार दिल्याने नातवाने ७८ वर्षीय आजीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर मृतदेह दोन गोण्यांत भरून दगडांच्या साहाय्याने घटप्रभा नदीच्या धरणाच्या खाडीत फेकण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी नातवाला आणि त्याला संरक्षण देणाऱ्या वडिलांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.
हुक्केरी तालुक्यातील अरळीक्कट्टी येथील हमन्ना बालप्पा सनदी (वय ७८) या १० नोव्हेंबर रोजी पाच्छापूर उत्सवासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी जिनराळ गावाजवळील घटप्रभा नदीच्या धरणाच्या खाडीत दोन गोण्यांमध्ये दगड भरून टाकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी मृत महिलेची मुलीने दिलेल्या तक्रारीवरून यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृत महिलेचा नातू भीमप्पा रामप्पा सनदी (वय २०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली.
आजीला मिळणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेच्या पैशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून तो वाटा मागत होता. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. १० नोव्हेंबर रोजी तो आजीला दुचाकीवरून गवी सिद्धेश्वर डोंगरावर घेऊन गेला. तेथे पैशांच्या कारणावरून पुन्हा वाद झाल्यानंतर आजीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातवाने तिला खाली ढकलून गळा दाबला आणि दोरीने गळा आवळून तिची हत्या केली.
हत्येनंतर मृतदेह डोंगरावर सोडून तो पाच्छापूर येथे गेला आणि दोन गोण्या घेऊन परतला. आजीजवळील २,३०० रुपये रोख रक्कम घेऊन त्याने मृतदेह गोण्यांमध्ये भरला. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून मृतदेह जिनराळ गावाजवळील धरणाच्या खाडीत नेला. यावेळी आजीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्याही काढून घेतल्या. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी गोण्यांमध्ये मोठे दगड भरून त्या पाण्यात फेकून दिल्या.
या गुन्ह्यात नातवाला मदत करून त्याला संरक्षण देणाऱ्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.








