- सलग तीन विजयांसह बेळगाव संघाची दमदार कामगिरी
- प्रतिस्पर्धी संघांना नमवत अंतिम सामन्यात प्रवेश
बेळगाव : कर्नाटक मिनी ऑलिंपिक स्पर्धेत बेळगाव डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या संघाने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच विजयाची लय कायम राखणाऱ्या बेळगावच्या खेळाडूंनी सलग तीन सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
बेळगावच्या संघाने पहिल्या सामन्यात उत्तर कन्नड संघाचा ४-० गोलफरकाने पराभव केला. त्यानंतर दक्षिण कन्नड संघाविरुद्ध ३-० असा एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात हसन संघाला ५-१ गोलने पराभूत करत बेळगावच्या खेळाडूंनी विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
तीनही सामन्यांमध्ये आक्रमक खेळ आणि प्रभावी सांघिक समन्वयाच्या जोरावर बेळगावच्या संघाने फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संघाने आता अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले आहे.
या यशाबद्दल बेळगाव डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडूंचे पालक आणि बेळगावमधील फुटबॉलप्रेमींकडून संघाचे अभिनंदन करण्यात येत असून, अंतिम सामन्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत.








