बेळगाव : दिवाळीचा सण सर्वत्र आनंद आणि उत्साहात साजरा होत असताना समाजातील काही गरजू आणि निराधार कुटुंबांना मात्र सणाचा आनंद अनुभवता येत नाही. अशा वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा उपक्रम जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे राबविण्यात आला.

ग्रुपचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण शिंदे यांनी यंदाची दिवाळी गरजू कुटुंबांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी रात्री ते ग्रुपच्या सदस्यांसह माडीगुंजीजवळील जंगल परिसरात पोहोचले. या भागात झोपड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजासारख्या वंचित घटकांतील कुटुंबांना त्यांनी दिवाळीच्या वस्तूंचे वाटप केले.

या उपक्रमासाठी लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंजी आणि चकली अशा पाच प्रकारच्या फराळाची ५० पाकिटे तयार करण्यात आली होती. याशिवाय ग्रुपच्या सदस्यांनी जमा केलेले चांगल्या प्रतीचे कपडे आणि साड्याही सोबत नेण्यात आल्या होत्या. गरजू पुरुषांना शर्ट-पँट, महिलांना साड्या, तर कुटुंबप्रमुखांना फराळाची पाकिटे आणि मेणबत्त्या देण्यात आल्या.

सणाच्या निमित्ताने मिळालेल्या या भेटवस्तूंमुळे तेथील कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. जायंट्स सदस्यांनी माणुसकीच्या भावनेतून केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यानंतर ग्रुपच्या सदस्यांनी रेल्वे स्थानक परिसरात जाऊन तेथील गरजू व्यक्तींनाही फराळ आणि कपड्यांचे वाटप केले. या उपक्रमात मधु बेळगावकर, प्रेमानंद गुरव, प्रदीप चव्हाण, आकाश लाटूकर आणि प्रकाश तांजी यांच्यासह अन्य सदस्य सहभागी झाले होते.

गरजूंच्या आयुष्यातही दिवाळीचा प्रकाश पोहोचावा, या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा ठरला.