- वृंदावनहून आलेल्या जानकीनाथ दास यांचे प्रवचन
- शेकडो भाविकांनी घातली गोवर्धनाला प्रदक्षिणा
बेळगाव : इस्कॉनच्या वतीने सुरू असलेल्या कार्तिक मासाच्या धार्मिक कार्यक्रमांतर्गत मंगळवारी श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात गोवर्धन लीला आणि गोवर्धन पूजेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त वृंदावनहून बेळगावला आलेले जानकीनाथ दास यांनी भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीलांचे महत्त्व विशद केले.
प्रवचनात बोलताना जानकीनाथ दास यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्ण गोकुळातून वृंदावनात आल्यानंतर तीन वर्षे सहा महिने तेथे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी वत्सासुर, बकासुर, अघासुर आणि धेनुकासुर या असुरांचा वध केला, तसेच कालिया मर्दनाची लीला केली. त्यानंतर ते पुन्हा नंदभवनात गेले.
गौडीय वैष्णव परंपरेतील संदर्भ देताना त्यांनी श्रीकृष्णांच्या बाललीलांची माहिती दिली. श्रीकृष्णांनी जन्मानंतरचा सुरुवातीचा काळ गोकुळात व्यतीत केला. तेथे अनेक संकटांचा सामना करत त्यांनी विविध लीला केल्या. गोकुळातील दामोदर लीला अर्थात उखळबंधन ही त्यांची शेवटची लीला होती. गोकुळात वारंवार येणारी संकटे लक्षात घेऊन गोकुळवासीयांनी वृंदावनात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
इंद्राचा गर्व दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी वयाच्या सात वर्षे दोन महिन्यांच्या काळात गोवर्धन लीला केली. गोवर्धन पर्वताला श्रीकृष्णांचे हृदय मानले जाते. त्यामुळे गोवर्धन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात कोणताही भेद नसल्याचे जानकीनाथ दास यांनी स्पष्ट केले.
गोवर्धन लीलेला श्रीकृष्णांच्या जीवनात विशेष स्थान असल्याने इस्कॉन चळवळीतही या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच परंपरेनुसार इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात दरवर्षी गोवर्धन पूजेचे आयोजन केले जाते.
प्रवचनानंतर गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम झाला. इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी सर्वप्रथम गोवर्धन पूजा करून प्रदक्षिणा घातली. त्यानंतर उपस्थित शेकडो भाविकांनी भक्तिभावाने प्रदक्षिणेत सहभाग घेतला. अशा धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात इस्कॉनमधील गोवर्धन लीला उत्सवाची सांगता झाली.








