- गोव्याहून गावी परतणाऱ्या ढोकेगाळीच्या युवकाचा जागीच मृत्यू
- दुचाकी आणि मिनी व्होल्वो बसची धडक
खानापूर : दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी गोव्याहून गावी येणाऱ्या २७ वर्षीय युवकाचा खानापूर-चोर्ला मार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला. कालमणी गावाजवळ रविवारी सकाळी दुचाकी आणि मिनी व्होल्वो टुरिस्ट बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत महेश परशराम मादार (वय २७, रा. ढोकेगाळी, ता. खानापूर) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने ढोकेगाळी परिसरात शोककळा पसरली आहे.
महेश हा गोवा विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी करत होता. दिवाळी कुटुंबीयांसोबत साजरी करण्याच्या उद्देशाने तो रविवारी सकाळी दुचाकीवरून आपल्या मूळ गावी ढोकेगाळी येथे येण्यासाठी निघाला होता. खानापूर-चोर्ला मार्गावरील कालमणी गावाजवळ त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या मिनी व्होल्वो टुरिस्ट बसला धडकली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने महेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच अंत झाला.
अपघातानंतर घटनास्थळी असलेले काँग्रेस कार्यकर्ते दीपक कवठणकर यांनी तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच महेशचा मृत्यू झाला होता. सणासाठी आनंदाने घरी परतणाऱ्या तरुणाचा प्रवास अशा प्रकारे संपल्याने उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच खानापूरचे पोलीस निरीक्षक एल. एच. गोवंडी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महेशच्या पश्चात आई-वडील, अविवाहित मोठा भाऊ, एक विवाहित व एक अविवाहित बहीण, तसेच काका-काकी असा परिवार आहे. दिवाळीच्या सणासाठी मुलगा घरी येणार म्हणून वाट पाहणाऱ्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
सणाच्या आनंदात कुटुंबीयांसोबत काही क्षण घालवण्यासाठी निघालेल्या महेशचा प्रवास अपघातामुळे कायमचा थांबला. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने कुटुंबाचा दिवाळीचा आनंद दुःखात बदलला आहे.








