• आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
  • डिझेल, सुटे भाग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे निर्णय

बेंगळुरू : कर्नाटकातील बस प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यातील चारही परिवहन महामंडळांच्या बस तिकीट दरात ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुधारित दर आज मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात लागू होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री भैरती सुरेश यांनी पत्रकार परिषदेत केली.

परिवहन महामंडळांचा वाढता परिचालन खर्च आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण लक्षात घेऊन भाडेवाढ करणे आवश्यक असल्याचे मंत्री सुरेश यांनी स्पष्ट केले. डिझेल, टायर आणि अन्य सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ तसेच बसच्या देखभालीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील वाढता आर्थिक भार ही दरवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील चारही परिवहन महामंडळांमध्ये सध्या सुमारे १ लाख ३ हजार ६०० कर्मचारी कार्यरत असून, २६ हजार १२५ बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. ‘शक्ती’ योजनेमुळे परिवहन महामंडळांना आर्थिक तोटा होत असल्याचा दावा फेटाळताना, या योजनेअंतर्गत महिलांच्या मोफत प्रवासाचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून महामंडळांना दिला जात असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. या योजनेंतर्गत दररोज सुमारे ७४.४ लाख महिला मोफत प्रवास करतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

गेल्या दहा वर्षांत बस तिकीट दरात केवळ एकदाच, म्हणजे २०२५ मध्ये वाढ करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. २०२१ मध्ये श्रीनिवास मूर्ती समितीने वेळोवेळी बस भाडेवाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर अतुल तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल तपासून सरकारकडे सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे परिवहन महामंडळांना भाडे सुधारित करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

चारही परिवहन महामंडळांवर विविध देणी थकीत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे २,९१६ कोटी रुपये, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ६०३ कोटी रुपये, वेतन सुधारणेची ६६४ कोटी रुपये आणि कर्मचाऱ्यांच्या अन्य देयकांचे ३५६ कोटी रुपये थकीत आहेत. या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी तिकीट दरात ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून राज्यातील बस प्रवाशांना सुधारित दराने तिकीट काढावे लागणार आहे.