- सजीबीआयटी कॉलेजमध्ये आयोजन ; ३४३ जणांनी घेतला लाभ
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हॅपी हार्ट फाउंडेशन आणि केएलई डेंटल कॉलेज यांच्या सहकार्याने शिवबसवनगर येथील एसजीबीआयटी कॉलेजमध्ये रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी आणि दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा एकूण ३४३ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे, रक्तक्षयाबाबत जनजागृती करणे आणि या आजाराचे लवकर निदान होण्याचे महत्त्व पटवून देणे हा होता. तसेच नियमित दंत तपासणीचे महत्त्व अधोरेखित करून दात आणि तोंडाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
समाजातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे आणि संभाव्य आजारांचे वेळीच निदान होण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा अशा शिबिरांचा प्रमुख हेतू आहे. या उपक्रमातून सहभागी लाभार्थ्यांना आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देण्यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. ‘स्वतःच्या आधी सेवा’ या रोटरीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत क्लबकडून असे उपक्रम सातत्याने आयोजित केले जात आहेत.








