- वैभव खाडे यांची संघटनेच्या संचालकपदी सर्वानुमते निवड
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना, बेळगाव यांच्यावतीने रविवार, १० जानेवारी २०२७ रोजी भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात संघटनेची बैठक रविवारी पैलवान मारुती घाडी यांच्या शास्त्रीनगर येथील निवासस्थानी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणपतराव पाटील होते.
बैठकीत आगामी कुस्ती मैदानाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यंदाचे कुस्ती मैदान मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पैलवान मारुती घाडी यांनी केले. यावेळी संघटनेच्या संचालकपदी वैभव खाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांचा १०७ वा वाढदिवस आनंदवाडी कुस्ती आखाड्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
बैठकीला गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, राजेंद्र कलघटगी, डॉ. गणपतराव पाटील, हिरालाल चव्हाण, संतोष होंगल, वैभव खाडे, पैलवान मारुती घाडी, विनोद चौगुले, मनोहर गावडा, नरहरी माळवी, राजू मजुकर, संजय चौगुले, भूमेश बिर्जे, मोनाप्पा मोरे, मुन्ना नसरदी, स्वस्तिक मोरे, ओम घाडी आणि समिधा बिर्जे आदी उपस्थित होते. संतोष होंगल यांनी आभार मानले.








