• मारहाण करून पैसे आणि मोबाईल लुटल्याचा आरोप
  • ४१ हजारांचा फोन आणि दुचाकी जप्त

बेळगाव : इंडाल्को ब्रिज महामार्गावर बुलेरो चालकाला मारहाण करून त्याच्याकडील पैसे आणि मोबाईल फोन लुटल्याच्या प्रकरणात माळमारुती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे प्रकाश कातबळी (१८, रा. संताजी गल्ली, कंग्राळी बी.के.), अमित पाटील (२०, रा. इंदूनगर, पाटील गल्ली, यमुनापूर) आणि ओमगणेश उमेश पुजारी (२३, रा. संताजी गल्ली, कंग्राळी बी.के.) अशी आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून ४१ हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि अन्य दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत पुढील कारवाई केली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलीस उपनिरीक्षक आनंद अडगोंडा, श्रीशैल हुलगेरी, उदय पाटील आणि जे. आय. देवडी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या पथकाच्या कामगिरीचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी कौतुक केले.