• युवा समितीच्या पाठपुराव्याला यश
  • फेटाळलेले मतदार नोंदणी अर्ज स्वीकारले

बेळगाव : मतदारयादी पुनर्निरीक्षण मोहिमेदरम्यान आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले नसल्याचे कारण देत बेळगाव उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांतील काही मतदार नोंदणी अर्ज महापालिकेने फेटाळले होते. मात्र, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात अशाच प्रकारचे अर्ज तहसीलदार कार्यालयाने स्वीकारल्याने एकाच प्रक्रियेत वेगवेगळे निकष लावले जात असल्याचा मुद्दा उपस्थित झाला.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या हेल्पलाईनद्वारे मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांचे ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले होते. हे अर्ज फेटाळल्याने युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी आक्षेप घेत केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगासह बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर महापालिकेने यापूर्वी फेटाळलेले अर्ज स्वीकारले असून संबंधित मतदारांची नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणात वगळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

मतदार नोंदणी प्रक्रियेत सर्वत्र एकसमान निकष लागू करावेत आणि पात्र नागरिकांना प्रक्रियात्मक विसंगतींमुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.