• धोकादायक वळणावर कार दोन पलट्या खाऊन उलटली
  • दोन चिमुकल्या मुलींवरील पितृछत्र हरपले

खानापूर : खानापूर-लोंढा महामार्गावर वाटरे आणि जोमतळे गावांदरम्यान गुरुवारी (२२ ऑक्टोबर) रात्री झालेल्या अपघातात गुंजी येथील विनोद संभाजी गुरव (३९) यांचा मृत्यू झाला. एका धोकादायक वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दोन वेळा पलटी होऊन उलटले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या विनोद यांचा मृत्यू झाल्याने गुंजी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

विनोद गुरव हे मूळचे गुंजी गावचे रहिवासी होते. नोकरीनिमित्त ते गोव्यात राहत होते. गुंजी येथे श्री माऊलीदेवीचा यात्रोत्सव सुरू असल्याने ते चार दिवसांपूर्वी गावी आले होते. मात्र, कामानिमित्त गुरुवारी सकाळी ते पुन्हा गोव्याला गेले. दिवसभरातील काम आटोपून सायंकाळी ते गुंजीला परतण्यासाठी निघाले होते.

गुरुवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास कुटुंबीयांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, आपण रामनगर येथे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीय त्यांच्या घरी परतण्याची प्रतीक्षा करत होते. मात्र, रात्री अकरा वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी पुन्हा त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलून विनोद यांचा अपघात झाल्याची माहिती दिली. ही बातमी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

अपघातानंतर विनोद यांना खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

विनोद गुरव यांच्या पश्चात पत्नी, चार आणि दोन वर्षांच्या दोन लहान मुली, आई-वडील, विवाहित मोठा भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. यात्रोत्सवाच्या काळात गावातील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने गुंजी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन आणि चार वर्षांच्या मुलींनी वडिलांचे छत्र गमावल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.