- राष्ट्रीय महामार्गाजवळ सीसीबी पोलिसांची कारवाई
- ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : शहरात हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीसीबी) पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय महामार्गाजवळील जय किसान भाजी मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ कारवाई करत पोलिसांनी २ लाख ९० हजार रुपये किमतीचे हेरॉईन आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
१७ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जय किसान भाजी मार्केटच्या गेट क्रमांक १ जवळ छापा टाकला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन विक्रीचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून महांतेश रामण्णा आंबीगेर (वय ३७) आणि आकाश सुरेश नंदी (वय २८), दोघेही रा. बेळगाव, यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपींकडून १४.४९ ग्रॅम हेरॉईनच्या १२४ छोट्या पुड्या जप्त केल्या. या अंमली पदार्थाची किंमत २ लाख ९० हजार रुपये असून, १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ‘अम्मा’ नावाच्या व्यक्तीकडून हेरॉईन आणल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.








