- तरुण-तरुणींसह महिला आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग
- पारंपरिक वेशभूषा, रांगोळ्या आणि फुलांच्या वर्षावाने दौडीचे स्वागत
बेळगाव : संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारी श्री दुर्गामाता दौड बेळगावमध्ये उत्साहात सुरू आहे. शेकडो तरुण-तरुणी, महिला आणि बालकांच्या सहभागामुळे या दौडीला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील विविध भागांतून जाणाऱ्या या दौडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सदाशिवनगर येथील श्री हरिद्रा गणेश मंदिरातून दौडीला प्रारंभ झाला. गणपतीची आरती, मंत्रोच्चार आणि ध्वजारोहण करून दौडीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सदाशिवनगर, नेहरूनगर, वड्डरवाडी आणि अशोकनगर येथील प्रमुख मार्गांवरून दौड मार्गस्थ झाली. छत्रपती शिवाजी महाराज, जगज्योती बसवण्णा यांच्या मूर्तींसह वड्डर यल्लण्णा यांची चित्रे एकाच मंचावर प्रदर्शित करण्यात आली. यामुळे विविध धार्मिक आणि सामाजिक विचारांचा समन्वय अधोरेखित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. महिलांनी रात्रभर मेहनत घेऊन आकर्षक रांगोळ्या काढल्या, फुलांची उधळण केली आणि आरती करून सहभागींचे स्वागत केले. तरुण-तरुणींसह माता आणि बालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. हिंदू धर्मातील विविध सणांचे महत्त्व सांगणारी कलात्मक सादरीकरणे, वारकरी व बाल शिवाजीच्या वेशभूषेतील मुलांची उपस्थिती आणि देशभक्तीपर वातावरण यामुळे दौडीचे आकर्षण वाढले. दौडीचे महत्त्व कवितेतून मांडणाऱ्या एका लहान मुलीच्या सादरीकरणाचेही उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी सांगितले की, पुढील पिढीपर्यंत आपली संस्कृती आणि परंपरा पोहोचविण्याच्या उद्देशाने गुरूंनी ३५ वर्षांपूर्वी या दौडीची सुरुवात केली. बेळगाव शहरातील दौडीचे हे २८ वे वर्ष असून, यंदा नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुरूंच्या संकल्पनेनुसार ही दौड काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारत असून, कर्नाटकातील सर्व ३१ जिल्ह्यांमध्ये ती पोहोचविण्याची जबाबदारी बेळगाव जिल्ह्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवबसवनगर येथील श्री जोतिबा मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मंत्रोच्चाराने दौडीची सांगता करण्यात आली. संस्कृती, परंपरा, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.








