- महिलांना तणावमुक्ती, ऊर्जेचा समतोल आणि आंतरिक शांततेचा अनुभव देण्याचा प्रयत्न
बेळगाव : महालय अमावस्या आणि नवरात्रीच्या प्रारंभाचे औचित्य साधून पाही वाईब्स फाउंडेशनतर्फे बेळगाव येथे महिलांसाठी विशेष हीलिंग आणि मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करून मानसिक शांतता मिळवणे, ऊर्जेचा समतोल साधणे आणि महिलांना स्वतःसाठी वेळ देण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
देवी दुर्गेच्या नऊ रूपांपासून प्रेरणा घेत या सत्रात महिलांच्या जीवनातील विविध भूमिका आणि त्यांच्यातील सामर्थ्याचा गौरव करण्यात आला. कुटुंब आणि समाजातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना अनेकदा स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सहभागी महिलांना आंतरिक शांतता अनुभवण्याची आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याची संधी मिळाली.
या सत्राचे मार्गदर्शन हीलिंग फॅसिलिटेटर डॉ. श्रीदेवी रेवण्णावर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या सत्राला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सत्रानंतर सहभागी महिलांनी प्रसन्नता, उत्साह आणि मानसिक समाधानाचा अनुभव व्यक्त केला.
पाही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू यांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देता येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महिलांचे मानसिक स्वास्थ्य, आत्मिक शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी सत्रांमध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.








