- हिंदी, संस्कृत आणि लोकगीत गायनात प्रथम क्रमांक
- चेन्नई येथे होणाऱ्या दक्षिण भारत प्रादेशिक स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत विकास परिषदेतर्फे सिंधनूर येथे आयोजित राज्यस्तरीय गायन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. हिंदी गायन, संस्कृत गायन आणि लोकगीत गायन या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या यशाच्या जोरावर विद्यार्थ्यांची चेन्नई येथे होणाऱ्या दक्षिण भारत प्रादेशिक गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिन्ही गायन प्रकारांत मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीत आणखी भर पडली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य प्रदीप पाटील यांच्याहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संगीत शिक्षिका अक्षता मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. के. पाटील, उपाध्यक्ष प्रा. आर. एस. पाटील, सचिव प्रा. नितीन घोरपडे, प्राचार्य प्रदीप पाटील आणि उपप्राचार्य मनोहर करडी यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शिकेचे अभिनंदन केले. आगामी दक्षिण भारत प्रादेशिक स्पर्धेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.
चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेतही ज्योती सेंट्रल स्कूलचे विद्यार्थी यशाची परंपरा कायम राखतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.








