बेळगाव : कंग्राळी बुद्रुक येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित गौंडवाड येथील महात्मा गांधी हायस्कूलची विद्यार्थिनी माधुरी पाटील हिने चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.
या स्पर्धेत माधुरीने उत्कृष्ट क्रीडाकौशल्य दाखवत ४०० मीटर धावणे आणि ४०० मीटर अडथळा शर्यत या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशामागे प्रशिक्षक मधुकर देसाई, शाळेचे क्रीडा शिक्षक एस. वाय. आंबोळकर, मुख्याध्यापक जी. एस. धामणेकर तसेच इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
जिल्हा पातळीवर अतुलनीय कामगिरी करून राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल माधुरी पाटील हिचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद व परिसरातून कौतुक होत आहे.








