- आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांना यश
- बाची शाळेसाठी ३ एकर, तर सुळगा येथे क्रीडांगणासाठी ४ आणि तलावासाठी २ एकर जागा
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाची आणि सुळगा (हिं.) गावांतील ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागण्यांना आता मूर्त रूप मिळणार आहे. आमदार व माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून दोन्ही गावांमध्ये क्रीडांगण आणि सार्वजनिक तलाव उभारण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संदर्भात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी चर्चा केली. यावेळी गावांतील सार्वजनिक गरजा आणि ग्रामस्थांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. त्यानंतर विविध विकासकामांसाठी आवश्यक शासकीय जमीन हस्तांतरित करण्याचे अधिकृत आदेश मिळाले.
- बाची शाळेसाठी ३ एकर जागा
बाची येथील शासकीय मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेत क्रीडांगण नसल्याने विद्यार्थ्यांना खेळासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे शाळेसाठी क्रीडांगणाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे केली होती.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या शारीरिक आणि क्रीडा कौशल्यांना वाव मिळण्यासाठी मैदानाची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार महसूल विभागाच्या मालकीची तीन एकर जमीन शाळेच्या क्रीडांगणासाठी शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश प्राप्त झाला आहे.
या जागेमुळे विद्यार्थ्यांना क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल यांसह विविध क्रीडा प्रकारांचा सराव करता येणार आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
- सुळगा येथे क्रीडांगणासह सार्वजनिक तलाव
सुळगा (हिं.) गावातही क्रीडांगण आणि सार्वजनिक तलाव उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. युवक आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या दोन्ही सुविधांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सार्वजनिक क्रीडांगणासाठी चार एकर, तर सार्वजनिक तलावासाठी बेळगाव तालुका पंचायतीला दोन एकर जमीन देण्याचा अधिकृत आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे गावातील युवक आणि खेळाडूंना क्रीडा सरावासाठी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच सार्वजनिक तलावामुळे स्थानिक गरजांसाठीही सुविधा निर्माण होईल.
ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये अद्याप क्रीडांगणांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना खेळ, शारीरिक व्यायाम आणि इतर उपक्रमांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरते.
बाची आणि सुळगा (हिं.) गावांमध्ये शासकीय जमीन उपलब्ध झाल्यामुळे क्रीडा तसेच सार्वजनिक सुविधांच्या उभारणीला चालना मिळणार आहे. ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक मंजुरी आणि आदेश मिळवण्यात आल्याने दोन्ही गावांतील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








