- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक जागा ओळखण्याची प्रक्रिया सुरू
- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव : जिल्ह्यातील विविध शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत नागरी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून गृहनिर्माण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याच धर्तीवर सेवानिवृत्त नागरी कर्मचाऱ्यांनाही स्वतःचे भूखंड उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली असून, त्यासाठी योग्य जमीन ओळखण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
मंगळवारी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील विविध शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत नागरी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ‘गृह भाग्य’ योजनेअंतर्गत सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना गृहनिर्माण सुविधा देण्यात येत आहेत.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही स्वतःचा भूखंड मिळावा, या उद्देशाने आवश्यक जमिनीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित विभागांच्या समन्वयातून उपलब्ध जागांची पाहणी आणि आवश्यकतेनुसार जागेची उपलब्धता तपासली जात आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त नागरी कर्मचाऱ्यांना भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.







