- मंडळांची वाढलेली संख्या, उंच मूर्ती आणि रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे विसर्जनाला विलंब
- पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची माहिती
बेळगाव : श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनासह महानगरपालिका आणि हेस्कॉमने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान आलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाचे नियोजन केले जाईल, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली.
रविवारी दुपारी श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना निकम म्हणाले की, यंदा गणेश मंडळांची संख्या वाढण्यासोबतच गणेशमूर्तींची उंचीही वाढली. तसेच रस्त्यांवरील विविध अडथळ्यांमुळे मिरवणुकीला विलंब झाला. यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल ४१ तास चालली. मिरवणूक शांततेत पार पाडणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते.
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी बाहेरील जिल्ह्यांतूनही पोलीस कुमक मागविण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सलग ४८ तास रात्रंदिवस कर्तव्य बजावले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करावे लागेल, असे निकम यांनी सांगितले.
यंदाच्या मिरवणुकीतील सकारात्मक बाबींवरही त्यांनी भाष्य केले. मिरवणुकीत लेझर आणि प्लाझ्मा लाईटचा वापर झाला नाही. तसेच डीजे साऊंडचे प्रमाणही सुमारे ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाले. डीजे आणि प्लाझ्मा लाईटच्या वापराबाबत गणेश मंडळांना विविध बैठकांमधून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम यंदाच्या उत्सवात दिसून आला.
यंदाच्या उत्सवातील अनुभव आणि अडचणींचा अभ्यास करून पुढील वर्षी अधिक चांगले नियोजन केले जाईल. तसेच मिरवणूक अधिक सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले.







