बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा शाळेने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बलाढ्य सेंट पॉल्स शाळेचा पेनल्टी शूटआउटमधील सडनडेथमध्ये ६-५ असा पराभव करत संत मीरा संघाने बाजी मारली.

पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने भरतेश इंग्लिश मीडियम स्कूलचा ३-० असा पराभव केला. संचित धामणेकर, श्रेयस चंदन आणि हरीष पिरजादे यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल्स शाळेने कनक मेमोरियल स्कूलचा ४-० असा पराभव केला. आराध्या नाकाडी आणि सकलेन मुल्ला यांनी प्रत्येकी दोन गोल केले.

अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. दुसऱ्या सत्रात सेंट पॉल्सला पेनल्टी शूटआउटची संधी मिळाली आणि त्यावर गोल करत त्यांनी १-० अशी आघाडी घेतली. मात्र, सामना संपण्यास अवघे दोन मिनिटे शिल्लक असताना संत मीराच्या रत्नाकर गौतमने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने पंच कौशिक पाटील यांनी पेनल्टी शूटआउटचा निर्णय घेतला. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन गोल केले. त्यामुळे सडनडेथचा अवलंब करण्यात आला. यात संत मीरा शाळेने सेंट पॉल्सचा ६-५ असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.

संत मीरा संघाकडून समर्थ पानारी, रक्षित रामगोंडा, रेहान अख्तर, रत्नाकर गौतम आणि अनिरुद्ध हलगेकर यांनी पेनल्टी शूटआउटमध्ये गोल केले. सेंट पॉल्सकडून अब्दुल मतीन सय्यद, नवीन पत्की, सुमित गंगेकर आणि आराध्या नाकाडी यांनी गोल केले. तर सकलेन मुल्ला आणि हर्षित रेवणकर यांना गोल करण्यात यश आले नाही.

या विजयानंतर संत मीरा शाळेचा संघ आगामी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. बक्षीस वितरण समारंभात नागराज भगवण्णावर, अँथोनी डिसोझा, जयसिंग धनाजी आणि बापू देसाई यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

  • सेंट पॉल्सचा सलग तिसरा पराभव

संत मीरा शाळेने गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सेंट पॉल्स शाळेला सलग दोन वेळा पराभूत केले आहे. तसेच फादर एड फुटबॉल स्पर्धेतही संत मीरा संघाने सेंट पॉल्सला पराभवाचा धक्का दिला होता. यंदाच्या विजयानंतर संत मीरा संघातील खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.