बेळगाव : गणेशमूर्ती विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी कपिलेश्वर येथील जुन्या व नवीन विसर्जन तलावांवर आवश्यक सुविधा दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त एम. कार्तिक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आयुक्त कार्तिक यांनी अधिकाऱ्यांसह दोन्ही तलावांची पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षितता, भाविकांची ये-जा आणि विसर्जनाची प्रक्रिया याबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापालिकेकडून तलाव परिसरात क्रेन, पाणी, प्रकाशयोजना, मंडप आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख विसर्जन तलावांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले असून, विविध ठिकाणी क्रेन आणि जीव रक्षकांची व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जन काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून मुदतीत तयारी पूर्ण करावी, असे आयुक्तांनी सांगितले. दोन दिवसांनंतर पुन्हा पाहणी करून तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.
यावेळी शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर, विकास कलघटगी, नगरसेवक राजू भातकांडे, गिरीश धोंगडी, मंगेश पवार यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.
जुन्या कपिलेश्वर विसर्जन तलावाशेजारी असलेली धोकादायक इमारत विसर्जन काळात पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, विसर्जन काळात कोणीही या इमारतीच्या परिसरात जाऊ नये, यासाठीही खबरदारी घेतली जाणार आहे.








