• श्री गणेश – श्री विठ्ठलाचा फुगडी खेळतानाचा मनमोहक प्रसंग
  • आजपासून गणेशभक्तांसाठी खुला ; मंडळाची ३५–४० वर्षांची परंपरा कायम

सुळगा (हिं.) : येथील ब्रह्मलिंग गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने गेल्या ३५–४० वर्षांपासून सुरू असलेली हलता देखावा सादर करण्याची परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवली आहे. यंदा मंडळातर्फे ‘वारी सोहळा’ या भक्तिमय प्रसंगाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.

या देखाव्यात श्री गणेश आणि श्री विठ्ठल भगवान फुगडी खेळतानाचा भक्तिमय प्रसंग साकारण्यात आला आहे. वारकरी भक्तीभावाने वारी करत पंढरपूरच्या दिशेने जातात आणि आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेऊन समाधानाने घरी परततात. याच भक्तिभावाचे सुंदर दर्शन हलत्या देखाव्यातून घडविण्यात आले आहे.

वारी सोहळ्याचा आनंद घेतल्यानंतर पुढे ‘श्री विठ्ठल दर्शन’ हा सजीव देखावाही भक्तांना अनुभवता येणार आहे. हा देखावा आजपासून सर्व गणेशभक्तांसाठी खुला करण्यात आला आहे.

गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व गणेशभक्तांनी या भक्तिमय आणि मनमोहक देखाव्याला आवर्जून भेट देऊन श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घ्यावे व देखाव्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.