- पंधराहून अधिक ठिकाणी दीर्घ शोधमोहीम पूर्ण
- मंत्री निवासस्थानाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी
बेळगाव : मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या निवासस्थाने व कार्यालयांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) केलेली शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष केला. ईडीची पथके कारवाई पूर्ण करून परतल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी निवासस्थानाबाहेर येताच समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता बेंगळुरू, बेळगाव, गोकाक आणि गोवा यासह पंधराहून अधिक ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली होती. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस कागदपत्रे आणि विविध आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदींची तपासणी केली.
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नातेवाईक वाय. मंजुनाथ तसेच निकटवर्तीय धरगशेट्टी, नरसन्नवर, डॉ. सोनवळकर आणि मलगौडा पाटील यांच्या निवासस्थानीही चौकशी व तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गोकाक येथील हिल्स गार्डनमधील निवासस्थानी इंडियन बँकेचे कर्मचारी मोठ्या पेट्या घेऊन दाखल झाले होते. तेथे बँकेशी संबंधित व्यवहारांची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संध्याकाळपर्यंत बेंगळुरू, बेळगाव आणि गोकाक येथील विविध ठिकाणी सुरू असलेली तपासणी पूर्ण करण्यात आली. या कारवाईदरम्यान नेमके काय जप्त करण्यात आले आणि तपासातून कोणती माहिती समोर आली, याबाबत ईडीच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्टता होणार आहे.
दरम्यान, दीर्घकाळ चाललेली ईडीची कारवाई संपल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी निवासस्थानातून बाहेर येताच समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला.








