कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था, पारायण मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि शाळा सुधारणा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील गुणवंत खेळाडूंचा नुकताच सन्मान करण्यात आला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय. एन. बुरुड होते. यावेळी आदर्श सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव यांनी खेळाडूंनी विनयशील राहून जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर गावासह राज्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. खेळामुळे आत्मविश्वास वाढतो. महात्मा गांधी सामाजिक संस्था गेल्या आठ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विधायक व प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे. खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने त्यांना पुढील वाटचालीसाठी उमेद आणि बळ मिळते, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गणेश यल्लाप्पा मोरे याने बेळगुंदी प्राथमिक शाळा विभागीय स्पर्धेत २०० मीटर धावण्यात प्रथम, तर ४०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला. श्रेयस दिलीप यळ्ळूरकर याने ६०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटकावला.

कर्ले माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कु. दर्शना जाधव, तनुजा यळ्ळूरकर आणि प्रियांका मोरे यांनी किणये विभागीय माध्यमिक स्पर्धेत कबड्डी व खो-खोमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. श्रेया मोरे आणि प्रितिका मा. मोरे यांनी बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

बेळगुंदी झोनल माध्यमिक स्पर्धेत बिजगर्णी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या पै. स्वस्तिक मोरे याने १०० मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक, तर कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. सानिका बाचीकर हिने ४०० मीटर रिले स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. बेळगुंदी हायस्कूलचा विद्यार्थी पै. विठ्ठल दे. मोरे याने ७५ किलो वजन गटातील कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.

यावेळी वाय. पी. नाईक, ॲड. नामदेव मोरे, एस. एम. जाधव, के. आर. भाष्कर, पुंडलिक जाधव, ज्योतिबा मोरे, शिवाजी जाधव, शिक्षक के. जी. मेणसे, शशिकांत गावडे, यल्लापा गावडा, लक्ष्मण जाधव, अशोक येटले, बाळासाहेब पसारे, पांडुरंग मोरे, अर्जुन सुतार, केदारी कणबरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी चेस बोर्डही उपलब्ध करून देण्यात आला.