- ८७२ मूर्ती जप्त ; बेळगावसह नऊ शहरांत विशेष पथके
बेंगळुरू : राज्यभरात १८ ऑगस्ट ते दोन सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान १५३ दुकाने व गोदामांची तपासणी केली. तसेच, सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून तयार केलेल्या ८७२ पीओपी गणेशमूर्ती जप्त केल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींची निर्मिती, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि विसर्जनावर बंदी घातली आहे. या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वन विभागाने विशेष कार्यदलाची स्थापना केली आहे. बेळगाव, बेंगळुरू, रामनगर, म्हैसूर, मंगळूर, दावणगिरी, धारवाड, गुलबर्गा आणि विजयनगर येथे विशेष पथके तैनात केली आहेत. या पथकांकडून पीओपीच्या गणेशमूर्ती ओळखणे, त्यांची विक्री रोखणे, तसेच मूर्ती जप्त करण्याची कारवाई केली जात आहे.
सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मूर्ती जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. वन व पर्यावरण मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मातीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण आणि कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन त्यांनी केले.








