बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदी बदली करण्याचा आदेश जारी झाल्यानंतर आता या बदलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलीबाबत पुढील एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

शनिवारी दुपारी बदलीचा आदेश उपलब्ध झाल्यानंतर रात्री पोलीस विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार रविवारी सकाळी १०.३० वाजता नव्या पोलीस आयुक्तांकडून पदभार स्वीकारला जाणार होता. मात्र, रविवारी सकाळी हा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम अचानक स्थगित करण्यात आला.

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार बोरसे यांच्या बदलीच्या आदेशाला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सूचना देण्यात आल्याचे समजते. मात्र, बदली रद्द झाली आहे की केवळ काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे, याबाबत अद्याप अधिकृत लेखी आदेश प्राप्त झालेला नाही.

गणेशोत्सव अगदी तोंडावर असताना शहराच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात येऊ नये, अशी अपेक्षा विविध स्तरांतून व्यक्त करण्यात आली होती. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक तसेच विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी असते. बदलीसंदर्भातील लेखी आदेश किंवा सरकारचा अंतिम निर्णय प्राप्त झाल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.