- गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सुविधा आणि तात्पुरत्या वीज जोडणीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.
गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण बेळगाव तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून आवश्यक डागडुजी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी समितीने केली. तालुक्यातील अनेक गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, गणेशोत्सवाच्या काळात नागरिक आणि गणेशभक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सवलती आणि सुविधा ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. गणेशोत्सवाचे आयोजन करणाऱ्या युवक मंडळांना तात्पुरती वीज जोडणी मोफत देण्यात यावी आणि त्यासाठी कोणतीही सुरक्षा ठेव आकारू नये, अशी मागणीही समितीने केली.
पावसाळा संपल्यानंतर दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत गावांमधील रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी समितीने केली. रस्त्यांची कामे रखडल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवून आवश्यक डागडुजीची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. ज्या गावांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, अशा गावांची यादी प्रशासनाकडे सादर करण्याची सूचना त्यांनी समितीला केली. त्यानुसार संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव मंडळांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या धोरणाचाही आढावा घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, समितीचे आर. एम. चौगुले यांच्यासह शिष्टमंडळातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








